मराठी भाषा वर्ग- प्रीती धोपाटे (२०२२-२३)




भाषा हा मानवी उत्क्रांती चा एक अद्वितीय टप्पा आहे. विचारांची  देवाणघेवाण हा भाषेचा मूळ हेतू! कालांतराने प्रदेशानुसार भाषा बदलत गेल्या.भाषा हा संस्कृतीचा मानबिंदू असतो. कोणत्याही संस्कृतीचा विकास हा भाषेच्या समृद्धीवर ठरत असतो. भाषा टिकली की विचार, प्रथा परंपरा टिकतात. ज्या ज्या वेळी एखादी सत्ता उलथवून टाकण्याचे प्रयत्न झाले तेव्हा सर्वात प्रथम तिथल्या भाषेवर हल्ला झाला… अनेक वर्षांचा इतिहास हीच साक्ष देत आहे. आणि त्यातही मातृभाषा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ! 

 

 

सातासमुद्रापार आपली भाषा टिकवण्यासाठी, पुढील पिढीला समृद्ध मराठी भाषेची ओळख होण्यासाठी तुम्हा सर्वांचे सुरू असलेले प्रयत्न खरोखरच अभिनंदनीय आहेत. मराठीचे लिपी सौंदर्य, प्रार्थना व गीतांचे माधुर्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषेतून विचार करण्यामधली गंमत या मुलांना अनुभवता येण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मराठी वर्गांची योजना करण्यात आली. लहानपणापासून परक्या देशात राहणाऱ्या किंबहुना इंग्रजी भाषेचा पगडा असलेल्या छोट्या छोट्या मुलांना मराठी भाषा वर्गात काय घ्यावे हा प्रश्नच होता. ऑनलाईन पद्धतीच्या अनेक मर्यादा देखील होत्या. पण हॉंगकॉंग महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा मुग्धा रत्नपारखी यांनी मुलांच्या भाषिक स्तराविषयी माहिती दिली व वर्ग आखणीत मोलाचे सहकार्य केले. प्रार्थना, गोष्टी, गाणी, एखादे कागदकाम, एखादा सोपा पदार्थ आणि अक्षर /शब्द लेखन अशी रचना तयार झाली. 

 

मी बोलेन ते  मुलांना समजेल का ? वर्ग एकतर्फी तर होणार नाही ना ? अमेरिकन ॲक्सेंट मध्ये बोलणाऱ्या मुलांना एक तासाचे मराठी अजिर्ण होईल का ? मुलांची उत्सुकता, लक्ष टिकून राहील का ? अश्या असंख्य प्रश्नांबरोबरच मराठी भाषा वर्ग सुरू झाला. सुरूवातीला एकमेकांना घाबरलेलो आम्ही हळूहळू एकमेकांना सरावलो. मुलं खूपच शिस्तप्रिय आणि मितभाषी आहेत. त्यांना मराठी भाषा ऐकण्याची व बोलण्याची उर्मी आहे. मराठी ही त्यांच्यासाठी आज्जी आजोबांची भाषा आहे. प्राथमिक जुजबी मराठी येणाऱ्या मुलांना दुसऱ्या, तिसऱ्या वर्गानंतर आपले मत मराठीतून मांडता येऊ लागले. गोष्टीतून काय शिकलो याबाबत थोडे सांगता येऊ लागले. एखादा पदार्थ तयार करताना द्याव्या लागणाऱ्या सूचनांमधली मराठी भाषा समजू लागली. मराठी लिपी शिकवताना मला विशेष आनंद झाला. मराठी भाषेचे अक्षर लेखनातील बारकावे समजावून देताना माझाही मराठी बद्दलचा अभिमान दुणावला.मराठी भाषा वर्गाचे फारच अद्भुत आणि सुंदर अनुभव आहेत. या निमित्ताने मातृभाषेची सेवा करण्याची संधी मिळाली याचाच आनंद आहे.

                श्रीराम, शिवराय, संत, बाल क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगताना बालमनात होणारी विचारांची, मूल्यांची रूजवण अधिक महत्त्वाची वाटली. गोष्ट सांगताना त्याची पार्श्वभूमी सांगणे, त्यांना समजेल, आचरणात आणता येईल असा बोध सांगणे ही खरंच तारेवरची कसरत होती. गोष्टींतून आनंदाबरोबरच एक बोध एक उत्तम विचार देण्याचा कटाक्ष नक्की पाळला. छोट्या छोट्या गेय प्रार्थनांमधून भक्तीरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बालबोलीतून गायलेल्या त्या प्रार्थना मला स्वतःला समृद्ध करत आहेत. या मुलांना  बालगीते शिकवताना गाण्यातील शब्दांचे अर्थ आणि परिस्थिती समजावून सांगताना भाषेचा कस लागला. कागदकाम व  एखादा सोपा पदार्थ तयार करताना मुलांच्या चेहऱ्यावरील स्व निर्मिती चा आनंद अवर्णनीय होता. या साऱ्यांमधून मराठी संस्कृती, महाराष्ट्रातील समाज घटक याबद्दल मुलांना माहिती मिळाली. हॉंगकॉंग महाराष्ट्र मंडळाच्या या मराठीच्या चळवळीत आजपर्यंत पाच दिवसीय तीन वर्ग व ८ दिवसाचा एक, तर शनिवार-रविवार असे दोन महिन्याचा एक वर्ग घेण्याचा योग आला. प्रदीर्घ वर्गापेक्षा मुलं छोट्या छोट्या पाच दिवसीय वर्गात अधिक रमलेली दिसली. दुसऱ्या दिवशीच्या वर्गासाठी आनंदाने हजर रहात होती. मस्त खेळत मराठी भाषा शिकत होती.

                      

पण या सर्व प्रयत्नांत सिंहाचा वाटा होता तो म्हणजे सर्व पालकांचा! आपली व्यवधानं सांभाळून मुलांबरोबर मराठी भाषा वर्गाला मुलांबरोबर हजर राहणे, शक्य नसल्यास अमराठी मदतनीसांना सूचना देऊन मुलांना वर्गाची तयारी करून देणे ही खरंच स्तुत्य गोष्ट आहे. आपण स्वतः मराठी भाषेचा घेतलेला आनंद आपल्या मुलांनाही मिळावा हा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच सुंदर आहे. आपण स्वतः मराठी भाषिक असल्याने आपण जगलेलं बालपण आपल्या मुलांच्या वाट्याला यावं हे‌ वाटणं सहाजिकच आहे. अर्थार्जनासाठी परदेशी गेलेल्या तुम्हा सर्वांची मने मात्र मराठी मातीतच रूजलीत आणि आजही मुळांना घट्ट धरून आहेत हे अभिमानास्पद व अभिनंदनीय आहे. पालकांनी घरी या मुलांबरोबर जास्तीत जास्त मराठीत बोलल्यामुळे मुलांच्या भाषा विकासात अधिक वेगाने सुधारणा होईल असे मनापासून वाटते.

          

वाणीला मराठी भाषेचा सराव देण्यापासून सुरू झालेला हा प्रवास  बुद्धीची, विचारांची भाषासुद्धा मराठीच होण्यापर्यंतचा आहे -या प्रवासाला खरं तर अंतच नाही, पण यातील माझे छोटेसे योगदान देण्याचा मी प्रयत्न केला. आपली मातृभाषा म्हणजेच मराठी भाषा ही आपली आनंदाची भाषा आहे. मातृभाषा हीच आपली यशाची भाषा आहे, हे सर्वांनाच सांगू या. मराठी भाषा शिकत असल्याचा अभिमान बाळगू या आणि मराठी भाषेचा सन्मान ठेवू या!

 

- श्रीमती प्रीती धोपाटे